तळेरे,दि.१६ जुलै
साळिस्ते नं.१ च्या विद्यार्थ्यांनी रानभाजी विक्रीतून फक्त दोन तासात रुपये 3000 ची कमाई केली. तळेरे येथील आज मंगळवार बाजार दिवसाचे औचित्य साधून मुलांनी रानभाजी प्रदर्शन आणि विक्री तळेरे येथे केली. बाजाराच्या आदल्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी रानातून कुरडई, टाकळा, भारंगी, काटला, गोट्याच्या वेलीचे तुरे, बांबूचे कोवळे तुरे, दूधुरली, रान अळू, पेवगा ,फणस गरे, फणसाच्या गोट्या,शेवग्याची भाजी, भाजीची केळी, चहापात, कढीपत्ता अशा विविध प्रकारच्या भाज्या जमा केल्या. दोरखंडाने भाजीची जुडी बांधली या भाजीच्या जुडीची किंमत फक्त दहा रुपये ठेवली होती.
मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता तळेरे येथे शाळेतील 25 विद्यार्थी भाजी घेऊन आले. भाजी मांडण्यासाठी स्टेजसुद्धा चांगला मिळाला. मुलांनी स्पीकरवर या …या …रानभाजी घ्या फक्त दहा रुपये …दहा रुपये …असा नारा लावला. मग काय, लोक कुतूहलाने भाजी बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी भराभर येऊ लागले. किंमतही मापक असल्याने लोकांनी पटापट भाजी घेतली. रानातून आणलेली भाजी आणि रासायनिक खत विरहित हे याचे मुख्य कारण होते. यातून विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान व संभाषण कौशल्य विकसित झाले . आपण आणलेली भाजी जास्तीत – जास्त कशी खपवायची याची जणू स्पर्धाच लागली होती. शाळेचा आगळावेगळा उपक्रम पाहून काही ग्राहकानी विद्यार्थ्यांना रोख रक्कम रुपयात बक्षीसही दिले .काही ग्राहकानी हातात माईक घेऊन शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर यांनी मुलांना वाहतुकीची व्यवस्था स्वतःच्या गाडीने केली. उपाध्यक्ष गजानन रामाणे यांनी मुलांना आईस्क्रीम दिला. रामभाजी प्रदर्शन उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजना ठाकूर मॅडम ,पारधिये सर ,वळवी मॅडम ,तळेकर मॅडम तसेच सर्व पालकांनी अचूक नियोजन करून हा उपक्रम यशस्वी केला. आमच्या या उपक्रमाला केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, केंद्रप्रमुख नितीन पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.