दळवी महाविद्यालयासमोरील वळणमार्ग अपघातप्रवण; नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
तळेरे,दि.०२ जुन
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे येथील दळवी महाविद्यालयासमोरील वळणमार्ग परिसरात महामार्ग सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी बसविण्यात आलेले पिवळे इशारा संकेतदिवे तसेच सौरऊर्जेवरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात सापडत आहे. त्यामुळे या भागात अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या वळणमार्गावर आठ दिवसांपूर्वी रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ही घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अंधारामुळे वळणमार्ग वेळेत न दिसणे आणि भरधाव वाहनांचा वेग यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यात भर म्हणजे, दळवी महाविद्यालयासमोरील वळणमार्गापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या इंधन भरणा केंद्राकडे जाण्यासाठी पूर्वी उपलब्ध असलेला तात्पुरता मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करून प्रवेश करावा लागत आहे. ही धोकादायक वाहतूक व्यवस्था अपघाताला निमंत्रण देणारी ठरत असून वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
तसेच तळेरे उड्डाण पुलावरील तसेच महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यांवरील अनेक पथदिवे काही ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जात असून अपघाताचा धोका वाढत आहे. सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी बंद पडलेले सर्व पथदिवे तातडीने दुरुस्त करून प्रकाश व्यवस्था पूर्ववत करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
दरम्यान, गटारांच्या समस्या, बंद पडलेले पथदिवे आणि इतर सुरक्षाविषयक त्रुटी याबाबत यापूर्वीही वृत्तपत्रांमधून तसेच सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत महामार्ग प्रशासनाच्या निदर्शनास बाबी आणून देण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले इशारा दिवे व पथदिवे देखभालीअभावी निष्क्रिय झाले आहेत. पर्यायी मार्ग बंद झाल्याने महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सुविधा बंद पडलेल्या असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
महामार्गावरील अंधार, बंद पडलेली सुरक्षा यंत्रणा, उड्डाण पुलावरील व सर्व्हिस रस्त्यांवरील निष्क्रिय पथदिवे, विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक आणि समस्यांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे तळेरे परिसरातील हा भाग सध्या अपघातप्रवण बनला असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.