देवगडात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा

शेअर करा

दीक्षित फाउंडेशनतर्फे निळकंठ श्रीधर दीक्षित यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा–२०२६’चे आयोजन

देवगड, दि.०९ ऑगस्ट
देवगड तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या दीक्षित फाउंडेशन, देवगड यांच्या वतीने निळकंठ श्रीधर दीक्षित यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा – २०२६ आयोजित करण्यात आली आहे.

“वाचनातून विचार, विचारातून संस्कार आणि संस्कारातून घडतो आदर्श विद्यार्थी!” या विचारातून प्रेरणा घेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, ज्ञानाची कक्षा रुंदावणे, स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे तसेच आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा आहे.

या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निळकंठ श्रीधर दीक्षित यांचे चरित्र व स्पर्धेसाठी आवश्यक माहिती दि. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत तालुक्यातील शाळांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर प्रश्नमंजुषा स्पर्धा त्यांच्या चरित्रावर आधारित असणार आहे.

दि. १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक शाळेने आपल्या सोयीच्या वेळेनुसार शालेय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करावे. शालेय स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निश्चित करून विजेत्या विद्यार्थ्यांची नावे आयोजकांकडे पाठविण्यात येणार आहेत.

शालेय स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके तसेच आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

तालुकास्तरीय अंतिम फेरी

शालेय स्तरावर विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी देवगड हायस्कूल, देवगड येथे तालुकास्तरीय अंतिम प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

तालुकास्तरीय अंतिम फेरीत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक घोषित करण्यात येतील. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अंतिम स्पर्धेचे स्वरूप व नियमावली सहभागी शाळांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, वाचनसंस्कृती, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत देवगड तालुक्यातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा ज्ञानोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन दीक्षित फाउंडेशनच्या वतीने निरंजन दीक्षित साहेब यांनी केले आहे.

“ज्ञानाची ज्योत तेवत राहिली तरच उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रकाशमान होतो.”

शेअर करा