तळेरे : कृतज्ञतेच्या भावनेतून जीवन समृद्ध होते : नानासाहेब जेधे

शेअर करा

जीवनविद्या मिशन कणकवली ज्ञानसाधना केंद्रातर्फे कृतज्ञता दिन महोत्सव; ‘सद्गुरू महिमा अगाध’ विषयावर प्रबोधन

तळेरे,दि.१० ऑगस्ट

निसर्गातील प्रत्येक व्यक्ती, प्राणी आणि वस्तू आपल्याला काही ना काही शिकवत असते. त्यामुळे प्रत्येकाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञता व्यक्त करणे हाच खरा मानवधर्म आहे. निरपेक्षपणे कोणताही मोबदला किंवा गुरुदक्षिणा न घेता सद्गुरू आपल्याला सुखी जीवनाची गुरुकिल्ली बहाल करीत असतात, असा संदेश जीवनविद्या मिशन कणकवली ज्ञानसाधना केंद्रातर्फे आयोजित ‘कृतज्ञता दिन महोत्सवा’त देण्यात आला.

जीवनविद्या मिशन कणकवली ज्ञानसाधना केंद्राच्या वतीने रविवारी कासार्डे येथील स्मित लॉन्स येथे कृतज्ञता दिन महोत्सव उत्साहात पार पडला. थोर समाजसुधारक व तत्त्वज्ञ सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या विचारांना अभिवादन करण्याबरोबरच सद्गुरूंच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपासना (हरिपाठ), संगीत जीवनविद्या, दीपप्रज्वलन आणि गुरुपूजनाने झाली. यानंतर विद्यार्थी गुणगौरव, मान्यवरांचा सत्कार, सुखसंवाद आणि स्तवन आदी कार्यक्रम झाले. मुंबई येथील प्रबोधक श्री. नानासाहेब जेधे यांनी ‘सद्गुरू महिमा अगाध’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सद्गुरूंच्या विचारांमुळे जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. आपल्या जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, घटक आणि निसर्गाप्रती कृतज्ञ राहणे आवश्यक आहे. कृतज्ञतेची भावना मनात रुजल्यास जीवन अधिक आनंदी, समाधानी आणि अर्थपूर्ण होते, असे नानासाहेब जेधे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला जीवनविद्या मिशनचे साधक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध भागांतून नामधारकांनीही मोठी उपस्थिती लावली. सद्गुरूंच्या विचारांचा प्रसार आणि कृतज्ञतेची भावना समाजात रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कृतज्ञता दिनाचा संदेश
“आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, निसर्गातील प्रत्येक घटक आणि मिळालेल्या प्रत्येक अनुभवाप्रती कृतज्ञ राहणे, हाच खरा मानवधर्म.”
सद्गुरू कोणताही मोबदला न घेता सुखी जीवनाची गुरुकिल्ली देतात. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हीच कृतज्ञता दिन महोत्सवामागील प्रमुख भावना होती.

शेअर करा