माजी पंतप्रधानांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण; त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाल्याची कार्यकर्त्यांची भावना
सावंतवाडी :
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्यावतीने आदरांजली व पुष्पांजली वाहण्यात आली. २१ मे १९९१ रोजी झालेल्या त्यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी हत्येमुळे देशाचे तसेच काँग्रेस पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
१९८४ ते १९८९ या आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राजीव गांधी यांनी भारताला २१ व्या शतकातील आधुनिक राष्ट्र बनवण्यासाठी तंत्रज्ञान, शिक्षण, युवा सक्षमीकरण आणि प्रशासकीय विकेंद्रीकरण या क्षेत्रांत क्रांतिकारक निर्णय घेतले, ज्याचा पाया आजच्या आधुनिक भारताला दिशा देत आहे, असे मत याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित या शोकसंभेला आणि आदरांजली कार्यक्रमाला सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रांतिक सदस्य ॲड. दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, सुभाष नाईक, राजन म्हापसेकर, सुधीर मल्हार, आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, संजय लाड, पीटर फर्नांडिस, इनास माडतीस, प्रज्ञा चौगुले, बाळा नमशी यांच्यासह असंख्य काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.