वेंगुर्ला : तालुक्यासह शहरात दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

शेअर करा

वेंगुर्ला,दि.१५ सप्टेंबर

कोकणात सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाल्यानंतर आज मंगळवारी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जनही करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत वेंगुर्ला तालुक्यासह शहरात ठिकठिकाणी गणपतींचे विसर्जन झाले. शहरी भागात रात्री उशिरापर्यंत गणपतींचे विसर्जन सुरू होते. पावसाच्या कमतरतेमुळे ओहोळातील पाणी आटल्याने गणपती विसर्जनावेळी पाण्याची उणिव जाणवली.
कोकणातील महत्त्वाचा असणारा सण आणि ज्या सणाची पूर्वतयारी गेले दोन महिने सुरू होती अशा गणेश चतुर्थीच्या सणाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. सर्रास अकरा दिवस हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा कोकणात दिसून येते. सोमवारी घरोघरी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर आरती, भजनही संपन्न झाले. आज मंगळवारी दीड दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. वेंगुर्ला शहरात साकव, पत्र्याचे पूल, चाफाळगा, आडीपूल, मांडवी खाडी, मानसी खाडी, वेशी भटवाडी याठिकाणी गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

शेअर करा