सर्वेक्षणासाठी दोन पथकांची नियुक्ती
वेंगुर्ला,दि.१५ जुलै
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकनाट्य परंपरेचा अविभाज्य घटक असलेल्या दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती ठिकाणी विशेष नोंदणी कक्षाच्या माध्यमातून कलाकारांची नोंदणी केली जाणार आहे.
या सर्वेक्षणाची अंमलबजावणीसाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सहाय्यक संचालक जयश्री घुगे, अधिक्षक जान्हवी जानकर, लिपिक टंकलेखक सहदेव खैरे ही एक टीम देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण येथे तर सहाय्यक संचालक संदिप वलखंडे, अधिक्षक संदिप वसावे, लिपिक टंकलेखक विजय मकेश्वर ही दुसर टीम वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी कार्यालयील वेळेत सर्वेक्षण करणार आहेत.
दि.15, 16 व 17 जुलै रोजी देवगड आणि कुडाळ, दि.20 ते 22 जुलै कालावधीत कणकवली आणि वेंगुर्ला, दि.23, 24 व 27 जुलै कालावधीत वैभववाडी आणि सावंतवाडी, दि.28, 29 व 30 जुलै कालवधीत मालवण आणि दोडामार्ग या ठिकाणी सर्वेक्षण केले जाणार आहे.
या सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील दशावतार कलाकार, दशावतार मंडळे तसेच या लोककलेशी संबंधित विविध घटकांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील दशावतार परंपरेचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि भविष्यातील विविध सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे.
दशावतार ही कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग परिसरातील समृद्ध लोकनाट्य परंपरा असून, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी ही कला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या परंपरेचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हा उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांनी आपल्या संबंधित तालुक्यातील पंचायत समिती विशेष नोंदणी कक्षास भेट देऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.