वेंगुर्ला:मातीखालून सापडलेल्या सरड्याच्या अंड्यांमधून 10 पिलांचा जन्म

शेअर करा

सर्पमित्र महेश राऊळ यांची चौथ्या वेळी यशस्वी कामगिरी

वेंगुर्ला,दि.३० सप्टेंबर

तुळस येथे मातीखालून सापडलेली सरड्याची अंडी कृत्रिमरित्या उबवून त्यातून 10 पिलांना जन्म देण्यात सर्पमित्र महेश राऊळ यांना यश आले आहे. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने त्यांची ही चौथी यशस्वी कामगिरी आहे.
तुळस येथील राजू परुळकर यांच्या घराच्या कामासाठी ठेवलेल्या वाळूमधून बाहेर आलेली सुमारे १४ अंडी आढळून आली होती. उन्ह, मुंग्या आणि इतर नैसर्गिक अडथळ्यांमुळे ती नष्ट होण्याची शक्यता होती. परूळकर यांनी महेश राऊळ यांना फोन करून याची माहिती दिल्यावर सर्पमित्र महेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व अंडी अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित स्थळी हलवली.
त्यांनी घरातच ओलसर माती व नारळाच्या भुशाचा वापर करून निसर्गसदृश उबवण केंद्र तयार केले. सुमारे 20 दिवस अचूक तापमान व आर्द्रतेची काळजी घेतल्यानंतर या अंड्यांमधून 10 निरोगी पिलांचा जन्म झाला. सर्व पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
यापूर्वीही महेश राऊळ यांनी तेल सरडा आणि गार्डन लिझार्ड अशा दोन प्रकारच्या सरड्यांची अंडी तीन वेळा यशस्वीरित्या उबवून सरड्यांच्या पिलांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे वन्यजीव संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

शेअर करा