वेंगुर्ला,दि.२८ जून(प्रथमेश गुरव)
वटपौर्णिमेच्या सणासाठी लागणाऱ्या साहित्यांनी आज रविवारी वेंगुर्ल्याचा आठवडी बाजार भरून गेला. सकाळपासूनच विविध साहित्यांची खरेदी करताना स्त्री व पुरूष दिसत होते. अधूनमधून पावसाची लागणारी हजेरी खरेदीमध्ये व्यक्तय निर्माण करीत होती.
पावसाला सुरूवात झाली की, चाहूल लागते ती वटपौर्णिमा या सणाची. आपल्या पतीला निरोगी आयुष्य मिळावे म्हणून वटवृक्षाची पूजा करण्यासाठी सुहासिनी महिला उत्सुक असतात. यावर्षी हा सण सोमवारी संपन्न होत आहे. दरम्यान, गेले दोन दिवस या सणासाठी लागणारे काळे मणी, अंशीचे दोन, बांगड्या आदी साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. आज रविवारी या साहित्यासोबतच आंबे, फणस, अननस, पेरू, फुले तसेच वड्याच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजारातपेठेत आल्या होत्या. बहुसंख्य महिलांनी उपस्थित रहात वटपौर्णिमा सणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. तर रविवारी वेंगुर्ल्याचा आठवडी बाजार असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.


