केर-भेकुर्लीतील प्रस्तावित M-Sand प्रकल्पाच्या स्थळ पाहणीस ग्रामस्थांचा एकमुखी विरोध

शेअर करा

ग्रामसभेत ठराव; पर्यावरण, जलस्रोत आणि शेतीच्या संरक्षणासाठी एकजुटीचा निर्धार

दोडामार्ग, दि.३० जुलै(प्रथमेश नाईक)
दोडामार्ग तालुक्यातील केर-भेकुर्ली परिसरात सर्व्हे क्रमांक 9/1 मध्ये प्रस्तावित असलेल्या M-Sand प्रकल्पाविरोधात केर व भेकुर्ली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. आयोजित विशेष बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने या प्रकल्पास विरोध करण्याचा ठराव मंजूर करत गावाच्या पर्यावरण, जलस्रोत आणि शेतीच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत पर्यावरण अभ्यासक म्हणून परिचित असलेले ‘रान माणूस’ प्रसाद गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना M-Sand प्रकल्पामुळे पर्यावरण, नैसर्गिक जलस्रोत, जैवविविधता, शेती आणि स्थानिकांच्या पारंपरिक हक्कांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी पत्रकार व ग्रामस्थ तेजस देसाई यांनी सांगितले की, सुरुवातीला केवळ पाच एकर क्षेत्रात प्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगितले जात असले, तरी भविष्यात त्याचा विस्तार सुमारे ७४ हेक्टर क्षेत्रापर्यंत होण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती धोक्यात येऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शेअर करा