करिअर कट्ट्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रदर्शनासह विक्रीचेही आयोजन!
आचरा,दि.०५ नोव्हेंबर (अर्जुन बापर्डेकर)
आचरा महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागाच्या वतीने दीपावलीनिमित्त आकाशकंदील तयार करणे, प्रदर्शन व विक्री हा विशेष उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील करिअर संसदेच्या सर्व विद्यार्थी सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हातांनी विविध आकर्षक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या आकाशकंदिलांचे प्रदर्शन भरविण्यात आले तसेच त्यांची विक्रीही करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल व आचरा हायस्कूलचे मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आचरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नितेश सारंग, करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्रा. निशिकांत कमळे, प्रा. सौ. आराध्या बागवे तसेच प्रा. सौ. प्रियांका कांबळी उपस्थित होते.
करिअर कट्टा हा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा उपक्रम आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, कौशल्य विकास तसेच रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पकतेतून वस्तू तयार करण्याची, त्यांचे आकर्षक सादरीकरण करण्याची तसेच प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, स्वावलंबन, उद्योजकता, संघभावना आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित होण्यास निश्चितच मदत झाली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक सणाचा आनंद जपत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रुजविणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.




