बांदा तलाठी कार्यालयात सर्कल अधिकारी नियमित गैरहजर

शेअर करा

नागरिकांची कामे रखडली; ऋतिका नाईक यांची तहसीलदारांकडे तक्रार

बांदा,दि.१५ जुलै
बांदा शहरातील तलाठी कार्यालयात सर्कल अधिकारी व संबंधित कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वारस नोंद, फेरफार, विविध दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जमीनविषयक कागदपत्रे तसेच इतर महसुली कामांसाठी दररोज अनेक नागरिक तलाठी कार्यालयात येतात. मात्र सर्कल अधिकारी आणि कर्मचारी नियमितपणे उपस्थित नसल्यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांचा मौल्यवान वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची चौकशी करून त्यांना नियमानुसार नियमित कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी ऋतिका नाईक यांनी केली आहे. गरज भासल्यास अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून कार्यालयीन कामकाज सुरळीत करावे, अशीही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सामाजिक कार्यकर्ते ओमकार नाडकर्णी, भाऊ वाळके यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा