बांदा : शक्तीपीठ महामार्गाविरोधात बांद्यात सामूहिक गाऱ्हाणे; ११२ हरकती दाखल, २१४ एकर जमीन संपादनाला तीव्र विरोध

शेअर करा

बांदा,दि.२० जुलै

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी बांदा शहर परिसरातील तब्बल २१४ एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याने शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बांद्याचे आराध्य दैवत श्री देव बांदेश्वर व ग्रामदैवत श्री भूमिका देवी मंदिरात ग्रामस्थांनी सामूहिक गाऱ्हाणे घालत महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला
प्रस्तावित महामार्गामुळे सुपीक शेती, बागायती, घरे, व्यावसायिक आस्थापने तसेच नागरिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या आराखड्यात ब्राह्मण देवळाचाही समावेश असल्याने स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
महामार्गाविरोधात बांदा परिसरातून एकूण ११२ हरकती प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींमध्ये जमिनींचे होणारे नुकसान, संभाव्य विस्थापन, पर्यावरणीय परिणाम तसेच शेती व व्यापारावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे.
प्रस्तावित संपादनानुसार बांदा शहरातील २१४ एकर, डेगवे १०२ एकर, पडवे-माजगाव ४३ एकर, पडवे ३० एकर, असनीये ४५ एकर, दाभील २७ एकर, घारपी ८ एकर, फणसवडे १४० एकर, नेने २५ एकर, उडेली ६० एकर, केगद १६० एकर, झोळंबे ७० एकर, फुकेरी ४५ एकर आणि कुंभवडे ६५ एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.
सामूहिक गाऱ्हाण्यावेळी उपस्थितांनी, “शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली बांदा परिसराचा विकास नव्हे, तर विनाश होणार आहे,” अशी भावना व्यक्त केली. स्थानिकांच्या शेती, घरे आणि उपजीविकेचा विचार करून प्रस्तावित आराखड्यात बदल करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
बांदा परिसरातून वाढत असलेला विरोध आणि मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या हरकतींमुळे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आता राज्यस्तरावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान समिती अध्यक्ष राजाराम (बाळू) सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, अरुण मोर्ये, गजानन गायतोंडे, मकरंद मोर्ये, समीर सावंत यांच्यासह बाधित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा