बांदा येथे एलसीबीची धडक कारवाई; ११.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

शेअर करा

बांदा,दि.२८ जून
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) बांदा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी पहाटे मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत एकूण ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास बांदा येथील खालसा पंजाबी ढाबा परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अनिश मंदार पांगम (वय २७, रा. जुना बाजार, सावंतवाडी) आणि अजित बाळकृष्ण मठकर (वय ३९, रा. सावंतवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून २ लाख ७३ हजार ८४० रुपयांची गोवा बनावटीची दारू तसेच ९ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई), ८१ व ८३ अन्वये बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड आणि पोलीस शिपाई अमर कांडर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे

शेअर करा