बांदा : एलसीबीची धडक कारवाई; गोवा बनावटीच्या दारूसह दुचाकी जप्त

शेअर करा

अवैध दारू वाहतूक करणारा संशयित ताब्यात; ₹१.०४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

बांदा ,दि.२७ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक आणि विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) शनिवारी बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, दारूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ₹१ लाख ४ हजार ४८० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोवा बनावटीची दारू दुचाकीवरून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. यामध्ये श्यामसुंदर सोनू कांबळे (वय ५४, रा. सातोळी हरिजनवाडी, ता. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच या प्रकरणात जॅकी सेलेस्टीम डिसोजा (रा. माडकोल, फुगीवाडी, ता. सावंतवाडी) याच्यावर मालक म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹२४ हजार ४८० किमतीची गोवा बनावटीची दारू तसेच ₹८० हजार किमतीची दुचाकी जप्त केली. असा एकूण ₹१ लाख ४ हजार ४८० किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक फौजदार सदानंद राणे, हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोझा, गोसावी आणि जॅक्सन हे सहभागी होते .

शेअर करा