देवगड तालुक्यात सरपंच आरक्षणात बदल; नागरिकांच्या मागास प्रवर्गातील एक जागा खुल्या प्रवर्गात

शेअर करा

२४ जुलै रोजी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत; सुधारित शासन निर्णयानुसार नव्याने आरक्षण निश्चित होणार

देवगड,दि.२० जुलै

महाराष्ट्र शासनाच्या सुधारित आदेशानुसार देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणात बदल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सन २०२५ ते २०३० या कालावधीतील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या एका सरपंच पदाची कपात करून ती जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली आहे.
शासनाच्या सुधारित अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या तालुक्यांमध्ये सरपंच पदांची संख्या अधिक आहे, त्या तालुक्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. देवगड तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायती असल्याने या तालुक्यातील सरपंच पदांच्या आरक्षणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुधारित आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी २ सर्वसाधारण व २ महिला, अनुसूचित जमातींसाठी १ महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ९ सर्वसाधारण व १० महिला, तर खुल्या प्रवर्गासाठी २४ सर्वसाधारण व २४ महिला अशी सरपंच पदांची आरक्षण रचना निश्चित करण्यात आली आहे.
या बदलानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गातील एका सरपंच पदाची सोडत (चिठ्ठी टाकून) काढून ते पद खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात येणार आहे. यासाठी २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता देवगड तहसील कार्यालयात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोडत प्रक्रियेस नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा