देवगड : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त न्हावनकोंड धबधब्यावर स्वच्छता व डागडुजी मोहीम

शेअर करा

तळवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा संयुक्त उपक्रम; प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या संवर्धनासाठी उत्स्फूर्त सहभाग

देवगड,दि.२५ जून


देवगड तालुक्यातील तळवडे गावातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या न्हावनकोंड धबधब्यावर मा. पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता व डागडुजी मोहिम राबविण्यात आली. ग्रामपंचायत तळवडे व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
न्हावनकोंड धबधबा हा तळवडे गावातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असून पावसाळ्यात आणि सुट्टीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देऊन निसर्गाचा आणि धबधब्यात पोहण्याचा आनंद घेत असतात. या पर्यटनस्थळाचे सौंदर्य अबाधित राहावे, परिसर स्वच्छ व सुरक्षित राहावा आणि पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही विशेष स्वच्छता व डागडुजी मोहीम आयोजित करण्यात आली.
तळवडे गावचे प्रशासक तथा सरपंच गोपाळ रूमडे यांच्या मार्गदर्शनाखाली धबधबा परिसरातील प्लास्टिक कचरा, झाडाझुडपे व इतर घाण साफ करण्यात आली. तसेच परिसरातील काही ठिकाणी आवश्यक दुरुस्तीची कामेही करण्यात आली.
या मोहिमेत तळवडे गावचे माजी सरपंच पंकज दुखंडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश लाड , ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील , ग्रामपंचायत अधिकारी खिल्लारे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश विष्णू माणगांवकर, उद्योजक विठ्ठलभाई पटेल , महेश लाड , ग्रामपंचायत कर्मचारी , ग्रा.प सदस्य तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोहिम यशस्वी केली.
यावेळी उपस्थितांनी पर्यटनस्थळांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत तळवडे आणि ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा