देवगड आगारात ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बस दाखल; प्रवाशांना दिलासा

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; लवकरच बस प्रवाशांच्या सेवेत

देवगड,दि.२५ जून

देवगड बस स्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ मालिकेच्या पाच नव्या एसटी बस दाखल झाल्या असून त्या लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत. या नव्या बसमुळे देवगड आगारातील बसची कमतरता काही प्रमाणात दूर होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवगड आगारात उपलब्ध बसांची संख्या अपुरी असल्यामुळे अनेक मार्गांवरील एसटी फेऱ्यांवर परिणाम होत होता. यामुळे विद्यार्थी, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत देवगड आगाराला ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बस लवकरच विविध मार्गांवर धावू लागणार असून त्यामुळे एसटी सेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. नव्या बस आगारात दाखल झाल्यानंतर प्रवासी, एसटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा