देवगड-जामसंडेतील ५३५ गुरांना टॅगिंगचा वेग; ५२ गुरांचे लंपी लसीकरण पूर्ण

शेअर करा

सर्व गुरांना टॅग लावण्याचे काम लवकरच पूर्ण होणार; कोंडवाड्याचे कामही युद्धपातळीवर सुरू – स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती उर्फ ‘बुवा’ तारी

देवगड,दि.१९ जुलै

देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील मोकाट गुरांच्या व्यवस्थापनासाठी नगरपंचायतीने प्रभावी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगरपंचायतीच्या सर्वेक्षणानुसार शहरात एकूण ५३५ गुरे असल्याची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी आत्तापर्यंत ५२ गुरांना टॅग लावून लंपी (Lumpy Skin Disease) प्रतिबंधक लसीकरणही करण्यात आले आहे, अशी माहिती स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती उर्फ ‘बुवा’ तारी यांनी दिली.

नगरपंचायतीकडून शहरातील सर्व गुरांची टप्प्याटप्प्याने नोंदणी करून त्यांना ओळख पटावी यासाठी टॅगिंगची मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाच्या सहकार्याने लसीकरणही सुरू आहे.

तारी यांनी सांगितले की, लवकरच शहरातील सर्व गुरांना टॅग लावण्याचे काम पूर्ण केले जाणार असून, मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कोंडवाड्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

नगरपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी ही मोहीम हाती घेतली असून, नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवक निवृत्ती उर्फ ‘बुवा’ तारी यांनी केले आहे.

शेअर करा