देवगड आगारातून मुंबईची अखेरची एसटीही बंद; प्रवाशांचे हाल, संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शेअर करा

बोरीवली फेरी १ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याचे आगार व्यवस्थापकांचे आश्वासन; अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्षाचा निर्धार

देवगड ,दि.२५ जुलै

देवगड एसटी आगारातून मुंबईकडे धावणारी एकमेव बोरीवली फेरीही अचानक बंद करण्यात आल्याने कोकणवासीयांसह मुंबईकडे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. देवगडहून मुंबईसाठी एकही थेट एसटी सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. या निर्णयाविरोधात भाजपचे उपतालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, संजय बांदेकर आणि मारुती उपरकर यांनी देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंडकर यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त करत निवेदन सादर केले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी, “मुंबईसाठीची एकमेव एसटी सेवा बंद करून सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय करण्यात आली आहे. विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. हा निर्णय तातडीने मागे घेऊन फेरी पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला.

यावर आगार व्यवस्थापक सौरभ औंडकर यांनी वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार या फेरीचे उत्पन्न कमी असल्याने ती तात्पुरती बंद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन १ ऑगस्टपासून देवगड–बोरीवली एसटी फेरी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

मुंबईकडे जाणारी एकमेव एसटी सेवा बंद झाल्यामुळे देवगड तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. सार्वजनिक वाहतूक ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असताना केवळ उत्पन्नाचे कारण पुढे करून सेवा बंद करणे कितपत योग्य, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. आश्वासनानुसार १ ऑगस्टपासून ही फेरी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

शेअर करा