देवगड,दि.०१ जुलै
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देवगड पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत गोवा व महाराष्ट्र बनावटीच्या अवैध दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ₹7,18,560 किमतीची दारू जप्त करण्यात आली असून तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ३० जून २०२६ रोजी रात्री १०.०५ वाजता मिठबाव येथील वळंजू यांच्या कॉम्प्लेक्समधील एका खोलीवर छापा टाकून करण्यात आली. याप्रकरणी श्रीकांत चव्हाण (रा. मिठबाव, ता. देवगड), विनोद वळंजू (रा. देवगड) आणि पप्पू कुडतरकर (रा. कुडाळ) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई), ८१ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे देवगड परिसरातील अवैध मद्यव्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.