महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार समितीची स्थापना; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यविषयक नियोजनात मिळणार जबाबदारी
देवगड,दि.२० जुलै
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी जारी केले आहे.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात आरोग्यविषयक उपक्रमांचे प्रभावी नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या सदस्य म्हणून साक्षी प्रभू यांचा समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील आरोग्यविषयक विविध योजनांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत त्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या बैठका आयोजित करण्यात येणार असून, बैठकीची तारीख, वेळ आणि स्थळ याबाबत सदस्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या या निवडीमुळे देवगड शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यविषयक प्रश्न मांडण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.