देवगड : एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थी व ग्रामस्थ त्रस्त; गढिताम्हाणे ग्रामस्थांचे सभापती गणेश राणे यांना निवेदन

शेअर करा

सडेवाडी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी; प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गणेश राणे यांचे आश्वासन

देवगड,दि.२५ जून

गढिताम्हाणे व रहाटेश्वर परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांना एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देवगड-तळेबाजार-तेलीवाडी व्हाया सडेवाडी या मार्गावरील एसटी बसफेऱ्या अनेक दिवसांपासून अनियमित सुरू आहेत. तसेच सडेवाडीसाठीची बसफेरी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. देवगड आगारातून सकाळी सुटणारी बस पूर्वी गढिताम्हाणे मार्गे बागतळवडे होत देवगडकडे जात होती. मात्र ही फेरी बंद करून दुसऱ्या मार्गाने बस चालविण्यात येत असल्याने देवगड महाविद्यालयात तसेच तळेबाजार हायस्कूल व क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय सकाळी, दुपारी आणि सायंकाळी धावणाऱ्या अनेक बसफेऱ्या वेळेवर न येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पूर्वी सडेवाडीपर्यंत जाणाऱ्या काही बसफेऱ्या तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित अडचणी ग्रामस्थांनी दूर करून याबाबतचा पत्रव्यवहारही देवगड आगार प्रमुखांकडे केला असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. तरीदेखील या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
या पार्श्वभूमीवर सडेवाडी बसफेरी पूर्ववत सुरू करून सर्व बसफेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार चालविण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारताना सभापती गणेश राणे यांनी हा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने मांडून एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

शेअर करा