सागर सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास प्रकार; मत्स्य विभागाकडून वनविभागाला माहिती
देवगड ,दि.१४ सप्टेंबर
तारामुंबरी समुद्रकिनारी सोमवारी दुपारी एक डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला. गस्त घालत असलेल्या सागर सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
देवगड येथील सागर सुरक्षा रक्षक अभिषेक कोयंडे हे सोमवारी दुपारी तारामुंबरी समुद्रकिनारी गस्त घालत होते. यावेळी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्यांना डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ याबाबत मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांना माहिती दिली.
यानंतर मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वनविभागाला याबाबत कळविण्यात आले आहे. मृतावस्थेत आढळलेला डॉल्फिन सुमारे पाच फूट लांबीचा असल्याची माहिती मिळाली आहे.
वनविभागाची टीम दाखल झाल्यानंतर डॉल्फिनच्या मृतदेहाचे पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरच डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.