डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी देवगड-जामसंडेत फॉगिंगला सुरुवात

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून पहिले फॉगिंग मशीन उपलब्ध; लवकरच आणखी दोन मशीन देण्याचे आश्वासन

देवगड,दि.२१ सप्टेंबर

देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. डासांमुळे विविध साथीचे आजार पसरण्याची भीतीही नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.

ही बाब देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या समस्येची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने एक फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिले आहे.

उपलब्ध झालेल्या फॉगिंग मशीनच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये धुराची फवारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे डासांच्या प्रादुर्भावापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, शहरातील वाढता डासांचा प्रादुर्भाव लक्षात घेता लवकरच आणखी दोन फॉगिंग मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे. ही दोन्ही मशीन उपलब्ध झाल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये नियमित धुराची फवारणी करून डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी सांगितले.

शेअर करा