कणकवली : गणेशोत्सव सणपूरक वस्तूंच्या विक्री महोत्सवाचे कणकवलीत उद्घाटन

शेअर करा

कणकवली,दि.०६ सप्टेंबर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्णानंद महिला मंच, कणकवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्सवी वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कणकवली पंचायत समितीच्या सभापती सौ. हर्षदा वाळके यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन झाले, तर कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नगरसेविका डॉ. सौ. सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी एकदंत गणेशाचे पूजन करून व श्रीफळ वाढवून विक्री शुभारंभ केला.

उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा देताना सभापती सौ. हर्षदा वाळके म्हणाल्या की, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते,” ही संकल्पना आता बदलत असून महिला स्वतःच्या कर्तृत्वाने आणि एकमेकींच्या सहकार्याने सक्षम व यशस्वी होत आहेत. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ यशस्वी’ हा सध्याच्या काळातील महिलांच्या प्रगतीचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन तेथे उपलब्ध असलेल्या विविध वस्तूंची माहिती घेतली. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी पुढील महोत्सवाचे आयोजन प्रशस्त व अधिक वर्दळीच्या ठिकाणी करण्यात यावे, यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी कुडाळ देशकर समाज मंडळाचे माजी अध्यक्ष शहेमंत परुळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. पूर्वी महिला मुक्तीचे कार्यक्रम समाजाच्या विविध स्तरांवर आयोजित केले जात होते; मात्र आजच्या काळात महिला स्वतःच्या सामर्थ्यावर सक्षम आणि स्वतंत्र विचारांच्या झाल्या आहेत. त्यामुळे आता पुरुषांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्घाटन सोहळ्यास कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. जाधव, कुडाळ देशकर समाज मंडळाचे अध्यक्ष दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत, अशोक नेरुरकर, ठाकूर गुरुजी, उदय ठाकूर, कमलाकर महाजन यांच्यासह पूर्णानंद महिला मंचच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध सणपूरक व उत्सवी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात करण्यात आली आहे. हा विक्री महोत्सव आज रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी व इच्छुक ग्राहकांनी आवर्जून भेट देऊन महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पूर्णानंद महिला मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा