भाजपकडून केलेलं आयोजन ; उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी,दि.०६ सप्टेंबर
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात राजापूर गोविंदा पथकाने बाजी मारली. १ लाख ११ हजार रुपयांच्या बक्षीसाचे ते मानकरी ठरले. या सोहळ्यात अभिनेता कुशल बद्रिकेची उपस्थित खास आकर्षण ठरली.
संदीप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत हा भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. राजापूर येथील गोकुळ गोविंदा पथकाने सात थरांचा मानवी मनोरा रचत एक लाख एक हजार एकशे अकरा रूपयांच्या बक्षीसाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर सावंतवाडीतील भटवाडी येथील महापुरुष मंडळाला दहीहंडी सोहळ्याचा पहिला मान देण्यात आला. विविध गोविंदा पथकांनी यावेळी आपले कौशल्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे विशेष आकर्षण प्रसिद्ध अभिनेते कुशल बद्रिके यांची उपस्थिती ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात आणखी रंगत आली. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप नेते विनोद राऊळ, उपसभापती गौरव मुळीक, पंकज पेडणेकर, जितेंद्र गावकर, रवींद्र मडगावकर, मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, सागर ढोकरे, पंकज तुळसूलकर, अभिजीत धुरी, अनिकेत आसोलकर, चैतन्य सावंत, साईनाथ हनपाडे, अभिषेक लाखे, किसान धोत्रे, अमित आसोलकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही या दहीहंडी उत्सवाला मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान, कोकणात एवढे सौंदर्य आहे की ते मॉरिशसमध्ये सुद्धा नाही. त्यामुळे येथील तरुणांनी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपले करिअर करावे. कोकणाच्या घराघरात कला आहे. गणपती आरती आणि भजन यातूनही कला उठून दिसते. कोकणाला सांस्कृतिक वारसा आहे. येथील पाण्याची चव सुद्धा वेगळी आहे. या ठिकाणी मी जन्मलो असतो तर हे भाग्य मला लाभले असते अशी भावना अभिनेता कुशल बद्रिके याने व्यक्त केली. तसेच लवकरच येथील नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबीराच्या माध्यमातून भेटीला येण्याचा शब्द त्यांनी दिला.
तर या उत्सवात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे व्यासपीठावरून भाजपचे नेते विनोद राऊळ यांनी थेट संदीप गावडे यांचा केलेला उल्लेख, जिल्हा परिषदेचे भावी अध्यक्ष असा उल्लेख करत त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या विधानामुळे आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष कोण ? या राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे. संदीप गावडे यांच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे उद्गार त्यांनी काढले.