स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई
कणकवली,दि.२९ जून
खारेपाटन-नडगीवे येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत कुख्यात KTM नानावत गँगच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. संबंधित आरोपीवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ३० हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा परदुम सिलोन नानावत (वय २९, रा. घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे) व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे यवत पोलीस ठाणे (जि. पुणे) हद्दीतील कुसेगाव पडवी परिसरात सापळा रचून आरोपीला सोमवारी (२९ जून) शिताफीने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅकसन घोन्साल्विस तसेच पोलीस शिपाई ऋषिकेश टोपले आणि अमर कांडर यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
पोलिसांनी आरोपीकडून या गँगने केलेल्या इतर घरफोडीच्या गुन्ह्यांचाही तपास सुरू केला असून, आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.