सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, सत्यशोधक कामगार संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या लढ्याला यश
कणकवली ,दि.१५ ऑगस्ट
कणकवली नगरपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाची अखेर नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या मध्यस्थीमुळे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनाला यश मिळाले आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मागणीसाठी अॅड. सुदीप कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या आंदोलन स्थळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देवून लेखी आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक बाळू पारकर , संकेत नाईक , लुकेश कांबळे आदी उपस्थित होते.
या आंदोलनात नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव, गजानन राणे आणि किशोर कदम यांनी सहभाग घेतला. आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनीही भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तसेच सामाजिक कार्यकर्ते वैभव मालंडकर, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश आरोलकर तसेच कास्टट्राईब पेन्शनर संघटनेचे संदेश पारकर यांच्यासह विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कामगारांच्या मागणीला पाठिंबा दिला. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार दोन महिन्यांच्या कालावधीत मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उभारण्यात आलेल्या या लढ्याला मिळालेले यश हे कामगारांची एकजूट आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचे फलित असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण आंदोलनात सकारात्मक मध्यस्थी करून प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, सत्यशोधक कामगार संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने अॅड. सुदीप कांबळे व सुजित जाधव यांनी विशेष आभार मानले.