कणकवली : नांदगाव येथे कार अपघात एकाचा मृत्यू

शेअर करा

कणकवली,दि.१३ सप्टेंबर

मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणाºया कारचा भीषण अपघात झाला. यात आनंद दादू लाड (वय ७०, रा. नालासोपारा, मुंबई) यांचा मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले आहेत. हा अपघात नांदगाव ओटव फाटा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणात दाखल होत असतानाच नांदगाव ओटव फाटा येथे रविवारी सकाळी कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. मुंबई-बदलापूर येथून आचरा-अडवली, मालवण येथे जाणारी कार नांदगाव ओटव फाटा येथे आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. अपघातात आनंद लाड यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते. अपघातात अन्य चार प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून चाकरमानी व गणेशभक्त सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करत काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून आले आहे.

शेअर करा