झाराप झिरो पॉईंट येथे वाहतूक पोलिसांनी घेतले ताब्यात;पाच ते सहा वाहनांना दिली ठोकर
कुडाळ,दि.१३ जून
वाहनांना ठोकर देत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील ट्रकचालकाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटनास्थळी झाराप झिरो पॉईंट येथे आज दुपारी ३ च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील ट्रक (टी जी ०७ डब्लू: ४७९१) आंबोली घाटातून महामार्गावरून कुडाळकडे येत असताना मद्यधुंद चालकाने हलगर्जीपणा करीत भरधाव ट्रक चालवीत अन्य वाहनांना ठोकर दिली. यामुळे अन्य वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या घटनेनंतर मद्यधुंद चालकाने न थांबता ट्रक मुंबई-गोवा महामार्गावरून कुडाळच्या दिशेने मार्गस्थ केला. यावेळी काही वाहनधारकांनी त्या ट्रकचा पाठलाग करून झाराप झिरो पॉईंट येथे अडवून विचारणा केली. तसेच पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली. त्यामुळे तत्काळ वाहतूक पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी संतप्त नागरिकांनी त्या चालकाला आपल्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. यावेळी झिरो पॉईंट बॉक्सवेलमध्ये मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.