पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांच्या प्रयत्नाना यश; सभापती मिलिंद नाईक यांनी दीले आदेश
कुडाळ,दि. १५ आॅगस्ट
तब्बल १८ वर्षे बंद असलेली कुडाळ ते वालावल माऊली मंदिर हुमरमळा एसटी बससेवा पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांच्या प्रयत्नाने आज सुरू झाल्याने विद्यार्थी व प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले.
कुडाळ ते हुमरमळा ही बससेवा १८ वर्षे झाली बंद होती. ही बस सुरु करण्यात यावी व हुमरमळा ते वालावलपर्यंत वाढलेली झाडी तोडण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी पंचायत समिती बैठकीत केल्यानुसार हुमरमळा ते वालावलपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडी तोडून घेतल्याने आज कुडाळ आगाराचे अधिकारी तसेच सरपंच अमृत देसाई, हुमरमळा ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांच्या उपस्थितीत बस हुमरमळापर्यंत आज आणून केवळ १८ वर्षाचा वनवास विद्यार्थी व प्रवासी यांचा संपला आहे.
सभापती मिलिंद नाईक यांचे आदेश :
कुडाळ पंचायत समिती सभेत पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी प्रश्न विचारताच सभापती मिलिंद नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक यांना सदर बस तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी बबन प्रभुमळेकर, युवासेना शाखाप्रमुख संदेश जाधव, लक्ष्मण खरात, दिलीप मार्गी आदी उपस्थित होते.