महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती; रुग्णांच्या सुविधांसाठी रुग्णवाहिका आणि निवासाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन
तळेरे, दि. १ नोव्हेंबर
‘सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म’ या भावनेतून दीपावलीचा आनंद समाजातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जीवन प्रबोधिनी ट्रस्ट आणि संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे ‘दीपावली संध्या’ या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत मुंबईत उपचारांसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या सुमारे ३०० कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांच्या समवेत दीपोत्सव साजरा करून आनंदाचे क्षण निर्माण करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी टाटा रुग्णालयात ये-जा करताना होणारा त्रास लक्षात घेऊन टाटा रुग्णालय ते संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट, दादर या मार्गावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावरील इमारत देशाच्या विविध राज्यांतून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना निवासासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी दिलेल्या या सकारात्मक आश्वासनामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
या प्रसंगी आयोजित भक्तिसंगीत कार्यक्रमामुळे रुग्णांना मानसिक आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. तसेच विशेष दंतचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्यसेवाही उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यक्रमास जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक श्री. सत्यवान नर, संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रशांत देशमुख, संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा, जे. जे. रुग्णालयाचे संस्थापक श्री. एकनाथ ठाकूर, भारतीय जनता पक्ष मुंबई महिला जैन सेलच्या अध्यक्षा श्रीमती दर्शना जैन यांच्यासह संत गाडगे महाराज मिशन ट्रस्टचे पदाधिकारी श्री. अमित पवार, श्री. हेमंत मकवाना, श्री. गणेश पार्टे, श्री. प्रशांत पवार, श्री. नागेश तांदळेकर, श्री. केशव परब, श्री. विनायक येंधे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक श्री. सत्यवान नर यांनी सांगितले की, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचारांचीच नव्हे, तर मानसिक आधार, प्रेम आणि आपुलकीचीही गरज असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, सणासुदीच्या काळात त्यांना कुटुंबाचा आधार आणि आपलेपणाची भावना देणे, हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. महापौर रितू तावडे यांनी रुग्णवाहिका आणि निवासाच्या सुविधेबाबत दिलेले आश्वासन या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांच्या, विशेषतः लहान बालकांच्या चेहऱ्यावर दिवाळी भेटवस्तू स्वीकारताना फुललेले हास्य हेच या ‘दीपावली संध्या’ उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
समाजातील गरजू, वंचित आणि आजाराशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट आणि संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट यांचे सेवाकार्य यापुढेही अखंड सुरू राहील, असा विश्वास श्री. सत्यवान नर यांनी व्यक्त केला.
