अकस्मात निधनाने भजनप्रेमी आणि सांप्रदायिक क्षेत्रात हळहळ; कोकणातील भजन परंपरेची मोठी हानी
कुडाळ,दि.१३ सप्टेंबर
तालुक्यातील पोयरेखुर्द गावचे प्रसिद्ध भजनकार आणि गुरुदास सांप्रदायाचे खंदे पुरस्कर्ते समीर कदम बुवा यांचे रविवारी पहाटे सुमारास अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पोयरेखुर्द परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनप्रेमी आणि सांप्रदायिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे तसेच कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
समीर कदम हे आपल्या मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी गायनासाठी विशेष ओळखले जात होते. कोकणातील भाविकांच्या मनात त्यांनी आपल्या भजनातून वेगळे स्थान निर्माण केले होते. ‘भजन हाच ध्यास आणि भक्ती हाच ओढ’ या भावनेतून त्यांनी आयुष्यभर सांप्रदायिक कार्य केले. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांनी सादर केलेल्या भजनांनी हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले.
त्यांच्या निधनामुळे कोकणातील भजन परंपरेतील एक महत्त्वाचा स्वर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. समीर कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ आणि काका असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.