मालवण,दि.२५ जून
काही दिवसापूर्वी मालवण धुरीवाडा येथे गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत वाहने जळून मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या गॅरेज मालक काळुजी उर्फ भाई कांदळगावकर यांना मालवण मधील मॅकेनिक बांधव व स्पेअर पार्ट विक्रेते यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली. तसेच कांदळगावकर यांचे नातेवाईक व मित्रपरिवार असलेल्या ‘बालपण ग्रुप’ मेढा मालवण यांच्या तर्फेही कांदळगावकर यांना आर्थिक मदत करण्यात आली.
मालवण धुरीवाडा येथील काळुजी उर्फ भाई सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजमध्ये काही दिवसापूर्वी आग लागून १५ दुचाकींसह कांदळगावकर यांची इंडिका कार जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. व्यवसायात अचानक आलेल्या या संकटामुळे भाई कांदळगावकर यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या संकट काळात मालवण मधील इतर गॅरेज चालक मॅकेनिक बांधव व गाड्यांचे स्पेअर पार्ट विक्रेते कांदळगावकर यांच्या मदतीला धावून आले असून त्यांनी जमवलेली आर्थिक मदत कांदळगावकर यांना सुपूर्द केली. तसेच कांदळगावकर यांचे बालपणापासून असलेल्या मित्रमंडळी व नातेवाईक यांचा बालपण ग्रुप असून या ग्रुपतर्फेही कांदळगावकर यांना आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीबद्दल भाई कांदळगावकर यांनी मॅकेनिक, स्पेअरपार्ट विक्रेते व बालपण ग्रुपचे आभार मानले.