मालवण : घरगुती गॅस वितरणात बायोमेट्रिक प्रणाली लागू करा-प्रसाद आडवणकर

शेअर करा

मालवण,दि.०३ जुलै

घरगुती गॅस सिलेंडरचा वाढता काळाबाजार, अनधिकृत विक्री आणि ग्राहकांच्या नावावर होणारा गैरवापर थांबवण्यासाठी रेशन दुकानांप्रमाणेच गॅस वितरणातही बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचा ठसा ( थम) घेण्याची प्रणाली लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद आडवणकर यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आडवणकर यांनी म्हटले आहे की, घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना अनेकदा रांगेत उभे राहावे लागते. दुसरीकडे, घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर आणि अनधिकृत विक्री होत असल्याच्या तक्रारी सतत समोर येत आहेत. काही ठिकाणी ग्राहकांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन त्यांच्या नावावर सिलेंडर वितरित केला जातो आणि नंतर तोच सिलेंडर जास्त दराने काळ्या बाजारात विकला जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

शासनाने ओटीपी प्रणाली लागू करून वितरणात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यातही काहीजण पळवाटा शोधत आहेत. विशेषतः बाहेरगावी किंवा मुंबईसारख्या शहरांत राहणाऱ्या ग्राहकांकडून ओटीपी मिळवून त्यांच्या नावावरील सिलेंडरचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

रेशन दुकानांमध्ये धान्य वितरणावेळी लाभार्थ्याचा अंगठ्याचा ठसा घेतला जातो. त्याच धर्तीवर गॅस सिलेंडर वितरणावेळीही ग्राहकाची बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करावी. त्यामुळे सिलेंडर खरंच संबंधित ग्राहकालाच मिळाला आहे, याची खात्री होईल आणि बनावट वितरण, फसवणूक तसेच काळाबाजाराला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे आडवणकर यांनी नमूद केले.

याशिवाय प्रत्येक गॅस वितरणाची माहिती ग्राहकाच्या मोबाईलवर लगेच आणि मराठीत पाठवावी, वितरणावेळी ग्राहकाचा फोटो किंवा डिजिटल नोंद ठेवावी, तसेच गॅस एजन्सींची नियमित तपासणी करून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शेअर करा