मालवण : टोपीवाला हायस्कूल, मालवणच्या साक्षी रावराणे हिचे दहावी परीक्षेत फेरतपासणीत ७ गुणांची वाढ; जिल्ह्यात पाचवी

शेअर करा

मालवण,दि.२७ जून

दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीत तब्बल ७ गुणांची वाढ झाल्याने अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवणची विद्यार्थिनी कुमारी साक्षी संजय रावराणे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गुणवाढीनंतर तिला ५०० पैकी ४९६ गुण (९९.२० टक्के) मिळाले असून तिने मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्ह्यातही तिने पाच वा क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.

यापूर्वी ८ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात साक्षीला ५०० पैकी ४८९ गुण (९७.८० टक्के) मिळाले होते. त्या गुणांच्या आधारे ती मालवण तालुक्यात प्रथम आली होती. मात्र स्वतःच्या अभ्यासावर व कामगिरीवर पूर्ण विश्वास असल्याने तिने उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी बोर्डाकडे अर्ज केला होता.

फेरतपासणीनंतर मराठी विषयात २ गुण आणि विज्ञान-१ विषयात ५ गुण अशी एकूण ७ गुणांची वाढ झाली आहे. त्यामुळे तिचे एकूण गुण ४९६ (९९.२० टक्के) झाले आहेत.

भाषा विषयांमध्ये साक्षीने विशेष प्रावीण्य मिळवत मराठीत ९७, इंग्रजीत ९८ आणि संस्कृतमध्ये ९९ गुण मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

साक्षीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच समाजातील विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा