सिंधुदुर्गातील दुष्काळी परिस्थितीची नितेश राणेंकडून पाहणी; शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न

शेअर करा

मळगाव-बादेवाडीतील करपलेल्या भातशेतीची पाहणी; आटलेल्या नदी-विहिरींचीही घेतली माहिती

सावंतवाडी,दि.२७ सप्टेंबर


सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्यासह जिल्हाधिकारी आणि सर्वच प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातशेतीची परिस्थिती जाणून घेत आहेत. आज प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली असून, शासनाकडे वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज केले.
​मंत्री राणे यांनी आज मळगाव-बादेवाडी येथील शेतकरी भास्कर गावकर यांच्या भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पावसाअभावी करपून गेलेली भातशेती तसेच आटलेल्या नदी आणि विहिरींचीही त्यांनी पाहणी केली.


​या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, प्रांताधिकारी विरसिंग वसावे,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, भाजपचे मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, संतोष राऊळ, मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, चंद्रकांत जाधव,संदेश सोनुर्लेकर आदी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले, “राज्यातील २६५ तालुके हे दुष्काळग्रस्त यादीत ‘ट्रिगर वन’मध्ये आहेत. त्यात सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांचा समावेश असून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ट्रिगर वनमुळे मिळणारी मदत योग्य पद्धतीने आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
​ ते पुढे म्हणाले, “यंदा पाऊस नसल्याने भातशेती अडचणीत आली असून भाताची वाढ खुंटली आहे. विहिरींतील पाणीसाठा कमी होत चालला आहे. या परिस्थितीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी सिंधुदुर्गात कोसळणारे पावसाचे पाणी वाया न घालवता छोट्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडवून साठवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भात आज अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून योग्य अभ्यास करून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आवश्यक निर्देश दिले जातील.”​महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मुख्यमंत्री लवकरच कोकणचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


​’जलतारा’ कामाचा शुभारंभ
​या वेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ करण्यात आला. ‘विकसित भारत रोजगार व आजीविका अभियाना’अंतर्गत हे काम करण्यात येणार असून, छोट्या खड्ड्यांच्या माध्यमातून जलसाठवणूक करण्याचा हा उपक्रम आहे. गावागावांत जलताराची कामे हाती घेतली जाणार आहेत असे त्यांनी सांगितले.

शेअर करा