मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगात; वाहतूक दोन दिवस बंद ठेवणार
सावंतवाडी,दि. २० ऑगस्ट
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू असून, यासाठी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
उत्सवादरम्यान शहरात येणाऱ्या गणेशभक्तांना, स्थानिक नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विशेष तयारी केली जात आहे. याच अनुषंगाने आज नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले नगरपालिकेचे नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर,पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, नीलम नाईक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली.
नगराध्यक्ष स्वतः या कामावर विशेष लक्ष ठेवून असून, त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदाराला कामाचा दर्जा उत्तम राखण्याबाबत सूचना दिल्या. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि बाहेरून येणाऱ्या भक्तांची आवक असते. त्यामुळे खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नयेत यासाठी हे काम प्राधान्याने पूर्ण केले जात आहे. दोन दिवस सहकार्य करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना करण्यात येत आहे,” असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
कामादरम्यान वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, रस्त्याचे काम तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.