सावंतवाडी : आंबोलीत मद्यपान तपासणी केंद्र आणि ट्रॉमा केअर सेंटर उभारा; ग्रामपंचायतीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

शेअर करा

सावंतवाडी,दि. २० ऑगस्ट
सिंधुदुर्गातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या आंबोली येथे वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायमस्वरूपी मद्यपान (ड्रिंक अँड ड्राईव्ह) तपासणी यंत्रणा उभारण्यात यावी, तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करावे, अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


प्रशासक सौ सावित्री पालेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ही महत्त्वाची मागणी केली आहे.
​आंबोली हे पर्यटन केंद्र असण्यासोबतच बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यांना कोकणाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. आंबोली घाटातून दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड आणि प्रवासी वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, मद्यपान करून वाहने चालवण्यामुळे मागील काही महिन्यांत या भागात अनेक भीषण अपघात झाले असून त्यात काहींना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या येथील तपासणी नाक्यावर मद्यपान तपासणीची (ब्रीथ ॲनालायझर) कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने अशा चालकांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे भविष्यात अधिक गंभीर अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


​याशिवाय, घाटातील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आंबोलीत ‘ट्रॉमा केअर सेंटर’ची सुविधा नाही. त्यामुळे जखमींना सावंतवाडी, पणजी किंवा बेळगाव येथे न्यावे लागते. या प्रवासात होणाऱ्या विलंबामुळे उपचारांअभावी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.


​या पार्श्वभूमीवर, आंबोली परिसरातील अपघातांवर आळा घालण्यासाठी आणि जखमींचे प्राण वाचवण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीने निवेदनात केली आहे.

शेअर करा