सावंतवाडी,दि.२५ जून
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सांख्यिकीय हवामान अंदाज मॉडेलवर आधारित, ग्रामीण कृषी मौसम सेवा (उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवसांचा मध्यम मुदतीचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे. हा अंदाज २६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीसाठी लागू असेल.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या ५ दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. २६ जून रोजी सर्वाधिक ६५ मि.मी. (मुसळधार) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर २७ जून रोजी ४५ मि.मी., २८ जून रोजी ३५ मि.मी., २९ जून रोजी ४५ मि.मी. आणि ३० जून रोजी ४० मि.मी. पावसाची नोंद होऊ शकते.
या काळात जिल्ह्याचे कमाल तापमान सुरुवातीचे तीन दिवस ३० अंश सेल्सिअस आणि शेवटचे दोन दिवस २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्व पाचही दिवस २४ अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. पावसामुळे हवेतील आर्द्रता कमालीची वाढणार असून, सकाळी ती ९३ ते ९७ टक्क्यांपर्यंत तर दुपारी ८८ ते ९४ टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
पुढील ५ दिवसांत वाऱ्याचा वेग ताशी १ ते ४ किलोमीटर इतका मंद ते सामान्य राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने दक्षिणेकडून, पूर्वेकडून आणि उत्तर-नैऋत्येकडून बदलत राहील. संपूर्ण कालावधीत आकाश मुख्यत्वे ढगाळ (६ ते ७ ऑक्टा) राहील. जिल्ह्यात पावसाचा जोर लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतीकामांचे योग्य नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.