सावंतवाडी, दि. २० जून
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानाजवळ, सबनीस वाडा येथे राहणारा संशयित आरोपी सुनील उर्फ सनी बाळू पाटील (वय ३८) याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. सावंतवाडी पोलिसांनी पाठवलेला हद्दपारचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी मंजूर केला आहे.
सुनील पाटील याच्यावर वराह (डुकरांचे) पालन आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश परब यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयामार्फत प्रांताधिकार्यांकडे सादर केला होता.
प्रांताधिकार्यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि लक्ष्मण काळे यांनी सुनील पाटील याला हद्दपारीचा आदेश बजावला. या आदेशानुसार पुढील दोन वर्षे त्याला या तीन जिल्ह्यांत प्रवेश करण्यास बंदी असणार आहे.
हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो सध्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जवळील निपाणी येथे वास्तव्यास गेला आहे. सावंतवाडी पोलिसांमार्फत त्याच्या निपाणी येथील पत्त्याची आणि वास्तव्याची माहिती संबंधित निपाणी पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.