सावंतवाडी,दि.१५ जुलै
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आरोग्य महा शिबिरात शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत होईल. त्यात हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून के. एल. ई. विद्यापीठ संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर बेळगाव, प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि आमदार दीपक केसरकर मित्र मंडळ, शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी २० जुलै रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तब्बल २१ आजारांवर मोफत उपचार तसेच शस्त्रक्रियाही केली जाणार असून, या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.
श्री. परब यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, महिला जिल्हाप्रमुख अँड. निता कविटकर, नगरसेविका सायली दुभाषी, स्नेहा नाईक, नगरसेवक देव्या सुर्याजी, भारती मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजू परब म्हणाले की, आमदार केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाआरोग्य शिबिर हे २० जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी होणार आहे. या शिबिराला विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून मोफत उपचार व शस्त्रक्रियाही यामध्ये होणार आहेत. या शिबिरामध्ये प्रामुख्याने हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, पचन संस्था व पोटाचे रोग, फिजिओथेरपी, स्त्रीरोग व प्रसुती, नेत्ररोग, ईसीजी, मेंदू व मध्य संस्था शस्त्रक्रिया, छाती व श्वसन रोग, कान-नाक-घसा, कर्करोग तपासणी, बालरोग, त्वचारोग, टू-डी इको आणि मधुमेह अशा विविध २१ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत. त्यामुळे या शिबिराचा गरजूंनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाआरोग्य शिबिरासोबतच १८ जुलै रोजी सकाळी आमदार केसरकर यांच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्यानंतर सावंतवाडी , दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यांतील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्ण व गरजूंना फळ वाटप, रक्तदाता संघटना नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या वतीनं सावंतवाडीत रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि गरीब जनतेला धान्य वाटप केले जाईल. रुग्णालयात फळवाटप तसेच १९ जुलै रोजी खास कबड्डी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.
महिला जिल्हाध्यक्ष अँड निता कविटकर यांनी सांगितले की, तिन्ही तालुक्यांमध्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फळ वाटप, छत्री वाटप व अन्य विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार केसरकर यांचा वाढदिवस या दिवशी केवळ सामाजिक उपक्रमांनीच साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.