सावंतवाडी:चौकुळ जमीन वाटपाबाबत गैरसमज दूर

शेअर करा

आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकाद्वारे मांडली शासनाची भूमिका

सावंतवाडी,दि.१३ सप्टेंबर
चौकुळ गावात कबुलायतदार जमीन वाटपाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी माजी मंत्री व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
​दिनांक १६ सप्टेंबर रोजी चौकुळ येथे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, कबुलायतदार गावकर सदरातील जमीन वर्ग-१ ने देण्याच्या संदर्भात त्याच दिवशी मुंबईत महसूल मंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाल्याने चौकुळ येथील बैठकीस उपस्थित राहता येत नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
​मोजणी आणि जमीन वाटपाची सद्यस्थिती:
​मोजणी पूर्णत्वाकडे: आंबोली व चौकुळ येथील कबुलायतदार गावकर व महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी जिल्हा निबंधकांमार्फत सुयश सर्व्हेअर एजन्सीकडे सोपवण्यात आली आहे. चौकुळ येथील ७० टक्के मोजणी पूर्ण झाली असून उर्वरित काम एका महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर आंबोली येथील मोजणीचे काम सुरू होऊन ते एका महिन्यात पूर्ण केले जाईल. पावसामुळे आणि डोंगराळ-जंगलमय भागामुळे या कामास काहीसा उशीर झाला आहे.
​वनक्षेत्र वगळण्याचा निर्णय: वनक्षेत्रात येणारी जमीन वगळून दोन्हीचे वाटप एकाच वेळी व्हावे, ही मागणी शासनाने मान्य केली आहे. मात्र, वनखात्याने महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे अपील केल्याने हा विषय प्रलंबित असून यावर लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
​ग्रामस्थांना आणि समितीला अधिकार:
चौकुळ गावातील कुटुंब संख्या निश्चित करणे, आणेवारीनुसार जमीन वाटप करणे आणि गावक्यांचे हक्क अबाधित ठेवणे हे सर्व अधिकार शासनाने २० सप्टेंबर २०२४ च्या पत्रान्वये चौकुळ गावाच्या ६५ सदस्यीय समितीला दिले आहेत. जमिनीचे वाटप सर्वांना समप्रमाणात करावे की कसे, याचा निर्णयही ग्रामस्थांनीच घ्यायचा आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
​शासकीय अटींमध्ये शिथिलता:
चौकुळ, आंबोली आणि गेळे या गावांना जमीन वाटप करताना शासनाने वाटपाच्या १३ अटी विशेष बाब म्हणून शिथिल केल्या आहेत. यामुळे सर्व जमिनींचे वाटप समान प्रमाणात करणे शक्य झाले असून ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. तसेच, जमीन वर्ग-१ ने मिळावी या मागणीचा पाठपुरावा महसूल मंत्र्यांच्या बैठकीत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
​चौकुळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर राहू, असा विश्वास व्यक्त करत आमदार दीपक केसरकर यांनी सर्व ग्रामस्थांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा