७० ते ८० गाई-बैल गावात सोडल्याचा आरोप; पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जनावरे कोंडवाड्यात जमा करून मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
सावंतवाडी ,दि.१७ जुलै
तळवणे हा गाव बारमाही शेती करणारा गाव आहे.या गावात वर्षभर पुरेसा पाण्याचा साठा असल्यामुळे नेहमी हा भाग हीरवळीचा दिसतो.गेल्या दोन वर्षात आजूबाजूच्या गावातील काही शेतकरी व काही स्थानिक शेतकरी याचा गैरफायदा घेत आपला शेतीचा हंगाम संपल्यावर आपली गाई गुरे व बैल चरण्यासाठी आणून तळवणे गावात सोडून जातात.व वर्षभर त्यांना ढुंकुन सुद्धा पाहत नाहीत,अशा गुरांची राखण, पालन कोणीही करत नसल्यामुळे ही 70 ते 80 गाय बैल दररोज गावात मोकाट फीरत आहेत.यातील काही जनावरे भाकड तर काही पाडस असल्याने शेतीच्या कामाला निरुपयोगी आहेत.त्यामुळे जाणून बूजून अशी जनावरे तळवणे गावात आणुन सोडली आहेत.सध्या पावसाळी हंगाम असल्याने हिरवी कुरणे उपलब्ध असल्याची संधी साधून हि जनावरे मोकाट सोडली आहेत,
या जनावरांनी गेली २ वर्षे तळवणे गावात उच्छाद मांडला आहे, ज्या ठिकाणी काजू सुपारी माडबगायत, केळी लागवड, भातशेती अशी मेहनतीने उभी केलेल्या शेती बागायतीमध्ये अशी मोकाट जनावरे रात्री अपरात्री कुंपणात घुसून प्रचंड नुकसान करत असून सिंचनाची पाईपलाईन तोडून टाकल्या आहेत , काही मालकांना वारंवार विनवणी करुनही ते जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.यामुळे गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे,या वर्षी एक तर पाऊस अत्यन्त कमी असल्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. त्यात पुन्हा गु्रांकडून होणारी नासधूस हि न परवडणारी आहे.शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मिळवलेल्या तुटपुंजीतुन मोठ्या शर्थीने बियाणी व खते खरेदी केली आहेत,यातच ऐन रुजुन आलेल्या बियाण्याची अशी मोकाट जनावरामुळे नासधूस होत असेल तर हा नाहक त्रास आम्ही का रोजरोज सहन करायचा? असा सवाल स्थानिक शेतकरी करत आहेत.
अशी उपद्रव करणारी गुरे तातडीने पकडून कोंडवाड्यात बांधवीत.संबंधित गुरांच्या मालकावर तातडीने गुन्हे दाखल करत कारवाई करावी व गुरे अतिक्रमण अधिनियम नुसार सदर नुकसान ची भरपाई संबंधित गुरांच्या मालकाकडून वसुल करून घेतली जावी अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडे तळवणे गावातील शेतकरी करत आहेत.