मालवण ,दि.१७ जुलै
पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मसुरे–डांगमोडे–मालडी या सुमारे चार ते पाच किलोमीटर रस्त्याचे काम गेली तीन वर्षे रखडल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. तसेच, पाच दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयासमोर तीव्र उपोषण व आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
सदर रस्त्याचे काम तीन वर्षांपासून सुरू असले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्त्यासह मोऱ्यांची कामेही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की पायी चालणेही धोकादायक बनले आहे. परिणामी, या मार्गावरील एसटी सेवा गेली तीन वर्षे बंद असून विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यावेळी कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रदीप भोसले आणि कनिष्ठ अभियंता साई चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे येत्या चार दिवसांत रस्ता तात्पुरता वाहतुकीयोग्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोर रस्त्याच्या निकृष्ट आणि रखडलेल्या कामाचा पाढाच वाचला. प्रकाश ठाकूर, हरी ठाकूर आणि राजेंद्र ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारत, “आणखी किती वर्षे या त्रासाला सामोरे जायचे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. ग्रामस्थ सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असतानाही संबंधित विभाग आणि ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
रस्त्यावर पावसाचे पाणी आणि वाहून आलेल्या मातीमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकींसह इतर वाहने घसरून वारंवार अपघात होत आहेत. रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या शेतात माती वाहून जाऊन पिकांचे नुकसान होत असल्याची व्यथाही ग्रामस्थांनी मांडली.
एसटी सेवा बंद झाल्याने महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांना पायपीट किंवा खासगी वाहनांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणे कठीण झाल्याने आरोग्य सेवेवरही गंभीर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.
ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात संबंधित ठेकेदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, तसेच रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत कोणतेही पुढील देयक अदा करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. पाच दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास मालवण येथील बांधकाम विभाग कार्यालयासमोर तीव्र उपोषण व आंदोलन करण्यात येईल, तसेच त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, माजी उपसरपंच पिंट्या गावकर, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, तसेच प्रकाश ठाकूर, परशुराम ठाकूर, महेश ठाकूर, राजेंद्र ठाकूर, बुधाजी ठाकूर, अशोक चव्हाण, किशोर ठाकूर, जुबेर सय्यद, खलील सय्यद, फारुख काझी, आसिफ शेख, प्रशांत चव्हाण, हरी ठाकूर, स्वप्निल ठाकूर, गुरुनाथ ठाकूर, मंगेश ठाकूर, सोमा ठाकूर यांच्यासह डांगमोडे, मालडी व मसुरे परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.