बांदा-दाणोली मार्गावर अपघात : ४ प्रवासी सुदैवाने बचावले
सावंतवाडी,दि.२० जुलै
बांदा-दाणोली जिल्हा मार्गादरम्यान असलेल्या विलवडे येथे खराब रस्त्यामुळे एका अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. सुसाट वेगाने जाणाऱ्या एका फोर्ड गाडीचा खड्ड्यामुळे ताबा सुटून ती थेट रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, यामुळे रस्त्यावरील विद्युत खांब एका बाजूने कलंडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील पाच पर्यटक फोर्ड कंपनीच्या गाडीने गोवा येथून आंबोलीच्या दिशेने प्रवास करत होते. गुरुवारी दुपारी विलवडे हायस्कूलजवळ गाडी आली असता रस्त्यावरील खड्ड्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी जाऊन थेट विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात गाडीतील चारही पर्यटक सुदैवाने बालंबाल बचावले असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
रस्ता वाहतुकीस योग्य करण्याची वाहनधारकांची मागणी
सध्या या जिल्हा मार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नूतनीकरण प्रलंबित असलेल्या ठिकाणी सध्याच्या दयनीय रस्त्याची तातडीने डागडुजी करून हा मार्ग वाहतुकीस सुरळीत आणि योग्य करावा, अशी जोरदार मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे.