​सावंतवाडी : गवळी तिठा येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला…

शेअर करा

सावंतवाडी पोलिसांकडून ४ तासांत ओळख पटवण्यात यश

सावंतवाडी,दि.२५ जून
येथील गवळी तिठा परिसरात आज एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या चार तासांत मयताची ओळख पटवली असून त्यांचे नातेवाईक सावंतवाडी येथे येण्यास रवाना झाले आहेत.
​याबाबत अधिक माहिती अशी की, गवळी तिठा परिसरात एक व्यक्ती बराच वेळ निपचित पडली असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी जवळ जाऊन खात्री केली असता, ती व्यक्ती मृत असल्याचे समजले. यानंतर स्थानिकांनी तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
​माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पुढील उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.
​दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी तपास चक्रे फिरवून अवघ्या चार तासांत मयताची ओळख पटवली. राजू रामा जामदार (रा. हेरा, चंदगड, सध्या बेळगाव, कर्नाटक) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी मयताचा मुलगा सूरज जामदार आणि पत्नी आशा जामदार यांच्याशी संपर्क साधला असून नातेवाईक सावंतवाडीच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली.

शेअर करा