सावंतवाडी,दि.२९ जून
मळेवाड गावात वटपौर्णिमा हा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील विवाहित महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
पहाटेपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजा साहित्यांसह वडाच्या झाडाजवळ ,मंदिरात गर्दी केली होती. धार्मिक विधीनुसार ब्राह्मणाच्या उपस्थितीत मंत्रघोषात वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर महिलांनी एकमेकींना वाण देत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी आपल्या संस्कृती व परंपरेचे जतन करत हा सण श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भारतीय संस्कृतीतील अशा पारंपरिक सणांचे महत्त्व जपण्याचे आवाहन केले.