सावंतवाडी : कलंबिस्त ग्रामसेवा मंडळ मुंबईच्या अध्यक्षपदी विश्वनाथ सावंत यांची फेरनिवड

शेअर करा


​सावंतवाडी, दि. २५ जून
मुंबईस्थित ग्रामस्थांच्या हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘कलंबिस्त ग्रामसेवा मंडळ, मुंबई’ची बैठक नुकतीच मुंबईत संपन्न झाली. या बैठकीत मंडळाची नवीन कार्यकारीणी एकमताने निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी विश्वनाथ सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी माजी सैनिक रवींद्र सावंत आणि खजिनदारपदी प्रकाश तावडे यांची निवड करण्यात आली.
​या बैठकीत माजी सचिव शशिकांत सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर नवीन कार्यकारीणी निवडताना मंडळाची घोडदौड अधिक गतीने वाढवणे आणि जास्तीत जास्त तरुणांना मंडळाचे सभासद करून घेण्यावर भर देण्याचे ठरले.
​यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वनाथ सावंत म्हणाले की, कलंबिस्त गावाच्या विकासासाठी यापूर्वीही मंडळाने काम केले आहे आणि पुढेही हे कार्य सुरू राहील. मुंबईत नोकरीनिमित्त राहणाऱ्या अनेक ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे मंडळ नेहमीच तत्पर असून, याद्वारे आपण गावच्या एकीचा नारा देऊया, असे आवाहन त्यांनी केले.
​ज्येष्ठ सदस्य सुरेश सावंत यांनी, मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून मंडळाच्या हितासाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. चंद्रकांत बिडये यांनी नमूद केले की, मुंबईत गावातील हजाराहून अधिक नागरिक नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांत मंडळाचे उपक्रम थंडावले होते, परंतु आता पुन्हा जोमाने कामाला लागून तरुणांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे. बैठकीत शशिकांत सावंत, नवनिर्वाचित सचिव रवींद्र सावंत, खजिनदार प्रकाश तावडे आदींनीही आपले विचार मांडले.
​या बैठकीला माजी सचिव शशिकांत सावंत, सुरेश सावंत, चंद्रकांत बिडये, प्रकाश मायबा सावंत, जयसिंग देसाई, काशीराम म्हाडगुत, रमेश देसाई, दीपक पास्ते, लक्ष्मण मर्गज, शांताराम बिडये, अमित मेस्त्री, रवींद्र सावंत, बापू पांगम, ज्ञानेश तावडे, राजेश सावंत, दशरथ बिडये, अनंत सावंत, महादेव सावंत, सुरेश पास्ते, प्रकाश तावडे, मिलिंद मटकर, अमित बिडये आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा